श्रीगोंदा तालुक्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातील कॉन्ट्रॅक्ट बेसवर कार्यरत असलेल्या प्राध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलगी व तिच्या पालकांना धमक्या देत आरोपीने जवळीक साधून अनेकदा अत्याचार केला. अखेर विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. या घटनेने स्थानिक शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पीडित मुलगी श्रीगोंदा शहरातील एका प्रसिद्ध विद्यालयात शिक्षण घेत होती. या विद्यालयात कॉन्ट्रॅक्ट बेसवर कार्यरत असलेला प्राध्यापक सुरुवातीला तिला आमिष दाखवत जवळीक साधू लागला. हळूहळू त्याने विद्यार्थिनीवर मानसिक दबाव टाकत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थिनीने विरोध दर्शवल्यावर आरोपीने तिच्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवत तिला गप्प बसवले. तक्रारीनुसार, २०२५ या काळात आरोपीने तिला वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये नेऊन बळजबरीने अत्याचार केला.
घटनेच्या काही दिवसांपूर्वी मुलगी शाळेत गेल्यानंतर घरी परतली नाही. त्यामुळे पालकांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी दोन दिवसांच्या शोधानंतर मुलीला शोधून काढले व पालकांच्या ताब्यात दिले.
सुरुवातीला घाबरलेली मुलगी काही बोलली नाही. मात्र पालकांनी विश्वासात घेतल्यावर तिने संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर पोलिस ठाण्यात आरोपी प्राध्यापकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.
पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी प्राध्यापकास अटक केली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थिनी व पालकांवर झालेले मानसिक व शारीरिक संकट पाहता आरोपीस कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.













