विखे-थोरात एकजुटीला मतदारांची पसंती; मोठ्या मताधिक्याने उमेदवार विजयी ! सहकार विकास आघाडीचे जिल्हा बँकेवर निर्विवाद वर्चस्व; १८ पैकी १७ जागांवर दणदणीत विजय

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: November 3, 2026

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार विकास आघाडीने ऐतिहासिक यश संपादन करत १८ पैकी १७ जागांवर विजय मिळविला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, चंद्रशेखर घुले यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विखे-थोरात यांच्या एकजुटीच्या बळावर आघाडीने जिल्हा बँकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

या निवडणुकीत सहकार विकास आघाडीने केवळ जागांच्या संख्येतच आघाडी घेतली नाही, तर अनेक मतदारसंघांत प्रतिस्पर्धी उमेदवारांवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली. कृषी, बिगरशेती, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय तसेच महिला मतदारसंघांत आघाडीच्या उमेदवारांना मतदारांनी भक्कम पाठिंबा दिला. त्यामुळे हा विजय केवळ निवडणुकीतील यश नसून सहकार विकास आघाडीच्या नेतृत्वावर सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाची पावती मानली जात आहे.

निवडणूक प्रक्रियेत संगमनेरमधून रणजीतसिंह देशमुख, नेवासा येथून शंकरराव गडाख, राहाता येथून डॉ. सुजय विखे पाटील, श्रीरामपूरमधून करण ससाणे, पाथर्डीतून आमदार मोनिका राजळे, शेवगावमधून राजश्री घुले पाटील, श्रीगोंद्यातून दत्तात्रय पानसरे, कोपरगावमधून बिबिन कोल्हे, नगर तालुक्यातून अक्षय कर्डिले आणि बिगरशेती मतदारसंघातून सचिन जगताप यांची बिनविरोध निवड झाली.

प्रत्यक्ष निवडणुकीतही सहकार विकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रभावी कामगिरी केली. काळे आशुतोष अशोकराव, नागवडे अनुराधाताई राजेंद्र, वाघ संगीता जयंत, पिचड वैभव मधुकर, जवळे करभारी झुंबर, सांगळे गणपतराव पुंजाजी आणि तनपुरे प्राजक्त प्रसाद यांनी विजय मिळवत आघाडीच्या यशात महत्त्वाची भर घातली. विविध मतदारसंघांतील मतमोजणीत प्रतिस्पर्ध्यांवर घेतलेली मोठी आघाडी ही या निवडणुकीतील विशेष ठरली.

जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील विविध घटकांना एकत्र आणणे, नेत्यांमधील समन्वय, कार्यकर्त्यांचे नियोजन आणि सभासदांशी असलेला संपर्क यामुळे सहकार विकास आघाडीला हे यश मिळाले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख, चंद्रशेखर घुले यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाचा या विजयात महत्त्वाचा वाटा राहिला. विखे-थोरात यांच्या एकत्रित नेतृत्वाला मतदारांनी दिलेला कौल म्हणून या निकालाकडे पाहिले जात असून, जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातही या विजयाची विशेष चर्चा होत आहे.

या ऐतिहासिक विजयासाठी साथ देणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचे, बँकेच्या सभासदांचे, मतदारांचे, सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींचे आणि हितचिंतकांचे सहकार विकास आघाडीतर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. आपण दाखवलेला विश्वास आणि दिलेली साथ हीच आमची खरी ताकद आहे. या विश्वासाला पात्र ठरत जिल्ह्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी, शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी यापुढेही प्रामाणिकपणे कार्यरत राहू, अशी ग्वाही आघाडीतर्फे देण्यात आली.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा